Logo
News.Rayat.in
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा
📍 श्रीगोंदा • 📅 २ मार्च २०२६ • ✍️ डॉ. राजेंद्र ठाकरे
ॲड. विजया घोडके यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना रॅगिंग अॅक्टची माहिती

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अँटी रॅगिंग या विषयावर कार्यशाळा संपन्न

रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अँटी रॅगिंग उपाय व वैशिष्ट्ये या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ॲड. विजया घोडके उपस्थित होत्या.

ॲड. विजया घोडके यांचे मार्गदर्शन

याप्रसंगी महिलांच्या कायद्याविषयी त्यांनी विचार व्यक्त केले. रॅगिंग अॅक्ट संदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "महिलांचा सन्मान करूया. मुलींनी तरुणपणात भावनांच्या आहारी जाऊ नये. महाविद्यालयीन युवक युवतींनी शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला पाहिजे. महाविद्यालयात कोणीही कोणाला त्रास देऊ नये. प्रत्येक विद्यार्थ्याने एकमेकाला सांभाळले पाहिजे," असे त्या म्हणाल्या.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे होते. ते म्हणाले की, "रॅगिंग ही एक गंभीर समस्या असून शैक्षणिक संस्थांमध्ये तिला बंदी आहे. कोणीही कोणाचा शारीरिक व मानसिक छळ करू नये. महाविद्यालयीन जीवन हे आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी असते. महाविद्यालयात येऊन ज्ञानसंपन्न बना," असे ते म्हणाले.

अँटी रॅगिंग कार्यशाळेतील विद्यार्थी

समन्वयक डॉ. हरिभाऊ वाघिरे यांनी पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. राहुल गायकवाड, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. प्रियांका म्हस्के यांनी केले. आभार डॉ. अनुराधा ताटे यांनी मानले.