Logo
News.Rayat.in
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा
📍 श्रीगोंदा • 📅 १६ फेब्रुवारी २०२६ • ✍️ डॉ. राजेंद्र ठाकरे
रयत शिक्षण संस्थेअंतर्गत महत्त्वाची शैक्षणिक नियुक्ती

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ. प्रकाश निवृत्ती साळवे यांची नियुक्ती

रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा येथे प्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ. प्रकाश निवृत्ती साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रा. डॉ. साळवे हे यापूर्वी महाविद्यालयात उपप्राचार्य तसेच भूगोल विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून भूगोल विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली असून संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांना मान्यता प्राप्त आहे. संशोधनाची सखोल दृष्टी, अध्यापनातील सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि प्रशासकीय कार्यक्षमतेमुळे त्यांची शैक्षणिक क्षेत्रात विशेष ओळख निर्माण झाली आहे.

त्यांनी आतापर्यंत सहा ग्रंथांचे लेखन केले असून त्यांच्या नावावर दोन पेटंट नोंदविण्यात आले आहेत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त संशोधन जर्नल्समध्ये त्यांच्या संशोधनपर लेखांचे प्रकाशन झाले आहे.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. "विवेक वाहिनी" अंतर्गत वारसा संवर्धन व समाजप्रबोधन या विषयांवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली असून पर्यावरण संवर्धनाबाबतही ते विशेष कार्यरत आहेत.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, माजी आमदार राहुल जगताप, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डॉ. प्रतिमा पाचपुते, अलका अनमुळे, प्राचार्य दिलीप भुजबळ तसेच रयत शिक्षण संस्थेतील सर्व शाखाप्रमुख, उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.